गारपीट व अवकाळी पावसाचा फटका; मोहोळ तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

मोहोळ : तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेली पिके आणि फळबागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. द्राक्ष, केळी, कांदा, पेरू यांसह विविध फळबागा, भाजीपाला आणि काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पूर्णतः नुकसानग्रस्त झाली आहेत. “हातातोंडाशी आलेला घास हिरावला” गेल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती आणि खंडाळी या गावांना भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तसेच शासनाने त्वरित उपाययोजना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.