सोलापुरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापौर कोंड्याल यांचे कडक निर्देश
सोलापूर : शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियोजित
आणि सुरळीत करण्याच्या उद्देशाने महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या
बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र
काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि महावितरण
चे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘SCADA’
(Supervisory Control and Data Acquisition) प्रणालीचे सविस्तर
सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून पाणीपुरवठा यंत्रणेवर रिअल-टाईम
नियंत्रण, गळती शोध, दाब व्यवस्थापन
आणि पाण्याचे प्रभावी वितरण शक्य होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागील प्रमुख कारणांमध्ये अनियमित
वीजपुरवठा असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून महावितरण अधिकाऱ्यांनी समन्वय
साधून अखंड वीजपुरवठा देण्याचे निर्देश देण्यात आले. महापौर विनायक कोंड्याल यांनी
अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्यात कोणतीही
तडजोड सहन केली जाणार नाही.” त्यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत पाणीपुरवठा
वेळेत आणि पुरेशा प्रमाणात करण्याचे आदेश दिले. तसेच SCADA प्रणालीचा
पूर्ण क्षमतेने वापर करून पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि नियंत्रित करण्यावर भर
देण्यात आला. तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याच्या
सूचनाही देण्यात आल्या. बैठकीत गळती रोखणे, जलसाठा
व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याचे रोटेशन आणि नागरिकांना कमी त्रास
होईल अशा पद्धतीने वितरण यंत्रणा सक्षम करण्यावर सविस्तर चर्चा झाली. एकूणच,
शहरातील पाणीपुरवठा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक
आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.