अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम; ५ हजार कुटुंबांना शिधा
सोलापूर : उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त
गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यात
भव्य समाजसेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिखर पहारिया फाउंडेशन च्या
वतीने आयोजित या उपक्रमांतर्गत तब्बल १४ ठिकाणी अन्न, शिक्षण,
आरोग्य, पाणी आणि स्वावलंबनाशी संबंधित विविध
योजना राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ जुनी मिल कंपाऊंड मैदान येथे ५
हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करून होणार आहे. याशिवाय दिवसभर विविध
ठिकाणी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून “एक वाढदिवस… हजारो हास्य” या
संकल्पनेतून माणुसकीचा महोत्सव साजरा केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत २००
विद्यार्थिनींना सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना शालेय बॅग,
तसेच ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक योजना राबविण्यात येणार
आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी १० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट, डिजिटल स्मार्ट बोर्ड आणि संगणक संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महिलांच्या
स्वावलंबनासाठी २०० महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच अनाथ
आश्रमासाठी ५० बेड देण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रातही मोठा दिलासा देत
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १०० मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
याशिवाय १०० ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची पात्रे बसविण्यात येणार असून नियमित
पाणीपुरवठा केला जाणार आहे. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी आणि
मंदिरांसाठी १ हजार पत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच कुंभारी येथे बोअरवेल
व सबमर्सिबल पंप बसवून पाण्याची सोय केली जाणार आहे. या उपक्रमांमुळे सोलापूर
जिल्ह्यात समाजसेवेचा व्यापक संदेश दिला जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने
उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.