सिंधुदुर्गात शिकारीदरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून
वैभववाडी तालुक्यात शिकारीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे,
तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. मृत युवकाचे नाव सागर सुरेश
पोटळे (वय २६, रा. घाणेगडवाडी, आचिर्णे)
असे असून, कृष्णा सुरेश कातकर (वय २५) हा गंभीर जखमी झाला
आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. प्राथमिक माहितीनुसार, आचिर्णे
गावाजवळील कालव्याच्या परिसरात काही तरुण शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी उंच
भागावरून खाली उभ्या असलेल्या व्यक्तींना जनावर समजून गोळीबार करण्यात आला. या
गोळीबारात सागर पोटळे यांच्या चेहऱ्यावर व हातावर गोळ्या लागून त्यांचा मृत्यू
झाला, तर कृष्णा कातकर यांच्या अंगावर अनेक ठिकाणी गोळ्या
लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज
सोनावळकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. जखमीवर कणकवली येथील खासगी
रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही अशाच प्रकारच्या शिकारीदरम्यान अपघात घडल्याने बेकायदेशीर शिकारीवर
कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीसांकडून पुढील तपास
सुरू असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.