‘अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा; ५ हजार कुटुंबांना दिलासा

सोलापूर : सुप्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने शहर व जिल्ह्यात १४ ठिकाणी विविध समाजोपयोगी महाउपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करून “अनंत” आनंदाचा शिधा देण्यात आला. जुनी मिल कंपाऊंड मैदान येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात हजारो महिला, विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या की, “हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता नसून माणुसकीचा महोत्सव आहे. ५ हजार कुटुंबांच्या चुली पेटवणे म्हणजे आशेचा दिवा लावण्यासारखे आहे.” दिवसभरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांत २०० विद्यार्थिनींना सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना शालेय बॅग, २०० महिलांना शिलाई मशीन देण्यात आले. तसेच १० शाळांमध्ये आरओ प्लांट, स्मार्ट बोर्ड आणि संगणक संच देऊन शिक्षणाला चालना देण्यात आली. अनाथ आश्रमांसाठी ५० बेड देण्यात आले असून कुंभारी येथे पाणीपुरवठ्यासाठी बोअर व सबमर्सिबल पंप बसविण्यात आला. जनावरांसाठी १०० ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय १ हजार पत्र्यांचे वाटप आणि १०० गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रमही राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मराज गुंडे यांनी केले. तन्वीर शेख यांनी स्वागत केले, तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.