खासदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट दौरा; ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही
अक्कलकोट : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती
शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील देवीकवठे, हिळ्ळी आणि कुडल
या गावांना भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. दि. ८ एप्रिल २०२६ रोजी
झालेल्या या गावभेट दौऱ्यात आयोजित बैठकीत स्थानिक नागरिकांनी विविध मूलभूत
समस्यांकडे लक्ष वेधले. यामध्ये उजनी धरणातील पाणी हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत
सोडण्याची मागणी, देवीकवठे व कुडल येथे बससेवा सुरू करणे,
रेशन धान्याचे नियमित वितरण, तसेच निराधार
पेन्शन वेळेवर मिळण्यासंदर्भातील प्रश्नांचा समावेश होता. ग्रामस्थांनी बंद
झालेल्या पेन्शन प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणीही केली. यावर खासदार
शिंदे यांनी सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेत प्रशासनाकडे पाठपुरावा करून समस्या
सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वसामान्यांच्या समस्या मांडणे आणि त्यावर ठाम भूमिका घेणे ही
लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून ती आपण प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. गावांच्या
सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी
ग्वाहीही त्यांनी दिली. दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत
केले. या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.