कसबा गणपती मंडळ समाजसेवेचे आदर्श उदाहरण – डॉ. ज्योती वाघमारे

सोलापूर : श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने नूतन राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विजयालक्ष्मी बाळासाहेब मुस्तारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गणपतीची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, तसेच विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. वाघमारे यांनी मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक करत सांगितले की, कसबा गणपती मंडळ हे केवळ धार्मिक परंपरा जपणारे नसून समाजसेवेच्या विविध उपक्रमांद्वारे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे आदर्श उदाहरण आहे. रक्तदान शिबिरे, शैक्षणिक मदत व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाने समाजात वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले. “अशा संस्थांचा सन्मान म्हणजे समाजातील सेवाभावाचा सन्मान आहे,” असेही त्या म्हणाल्या. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “या सन्मानामुळे मला जनतेसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची नवी उमेद मिळाली आहे.” तसेच मंडळाच्या पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.