नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरातला पुन्हा पोलीस कोठडी
नाशिक : भोंदू बाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात
याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडी
संपल्यानंतर आज त्याला जिल्हा न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात
आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी
सुनावली. या प्रकरणात पोलिसांना आरोपीने महिलांना दिलेल्या गुंगीच्या औषधाचा तपास
करायचा असल्याने कोठडीची मागणी करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुरुवातीला
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काही वेळ कामकाज थांबवण्यात आले. यावेळी
न्यायालयाने आरोपीला पोलीस मारहाण करत आहेत का, असा प्रश्न
विचारला असता, खरातने मारहाण होत नसल्याचे सांगितले. सरकारी
वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात गुन्ह्याचे गांभीर्य मांडताना सांगितले
की, आरोपी स्वतःला देवाचा अवतार असल्याचे भासवून महिलांना
जाळ्यात ओढत होता. त्यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप
आहे. गुंगीच्या औषधात नेमके काय वापरले जात होते, याचा तपास
करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बचाव पक्षाचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध करत, यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्येही अशाच प्रकारचा युक्तिवाद करण्यात आल्याचे
नमूद केले आणि पुढील कोठडीची गरज नसल्याचा दावा केला.