आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात प्रणिती शिंदेंकडून अभिवादन; केंद्र सरकारवर टीका
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंबेडकर चौक येथे त्यांच्या
पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आले. या कार्यक्रमाला शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे तसेच जिल्हाध्यक्ष
सातलिंग शटगार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी
डॉ. आंबेडकरांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आयुष्यभर आचरणात
आणण्याचे आवाहन केले. “संविधान जपण्याचा संकल्प करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची
पद्धत आहे,” असे त्यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद
साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली. देशातील लोकशाही व
संविधान धोक्यात असल्याचा आरोप करत, “लोकशाही व संविधान
वाचवण्यासाठी संघटित संघर्षाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद
केले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. संसद व विधिमंडळात ३३
टक्के महिला आरक्षणासाठी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे विधेयक मंजूर झाले असल्याचे
त्यांनी सांगितले. तसेच, महिला आरक्षणाची अंमलबजावणी
मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडण्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला. महत्त्वाच्या
विधेयकांपूर्वी देशभर चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी संवाद ही
लोकशाहीची खरी ताकद असल्याचे अधोरेखित केले. सध्याचे सरकार एकतर्फी निर्णय घेत
असल्याची टीका करत त्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन
केले. या प्रसंगी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते.