सोलापुरात भोंदू बाबा अशोक खरातविरोधात संताप; प्रतीकात्मक एन्काऊंटर करून कठोर शिक्षेची मागणी

सोलापूर : महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात सोलापुरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकात त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आणि महिला भगिनींच्या हस्ते गोळ्या घालून प्रतीकात्मक ‘एन्काऊंटर’ करण्यात आले. या आंदोलनाद्वारे अशोक खरातला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा सरकारने तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. आरोपांनुसार, अशोक खरात याने मंत्र-तंत्रविद्येच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच काही अश्लील व्हिडिओ तयार केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात त्याचे काही राजकीय नेते व प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. तसेच, खरातसोबत संबंध असलेल्या सर्व संबंधितांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणीही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास, मनिषा कोई, सोनाली सगर, संजीवनी सलबत्ती, गणेश कदम, अॅड. बाबासाहेब सपाटे, तेजस शेळके, रमेश भंडारे, फिरोज सय्यद, इर्षद नागोरे, जैनुद्दीन नदाफ, संतोष सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.