“युद्ध सुरू राहिले, तर गंभीर परिणाम”; मध्यपूर्वेवर PM मोदींची स्पष्ट भूमिका
नवी दिल्ली : पंतप्रधान Narendra Modi यांनी मंगळवारी राज्यसभेत मध्यपूर्वेतील
तणाव आणि इराण संघर्षावर स्पष्ट भूमिका मांडत, “युद्ध सुरू
राहिले, तर त्याचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतील,”
असा इशारा दिला. लोकसभेनंतर राज्यसभेत बोलताना त्यांनी सांगितले की,
भारताने नेहमीच संवादाचा मार्ग स्वीकारला असून सर्व संबंधित देशांशी
सातत्याने संपर्क ठेवला आहे.
युद्ध मानवतेसाठी घातक
पंतप्रधान म्हणाले की, कोणतेही युद्ध मानवतेच्या हिताचे नसते. संघर्षाचा
तोडगा संवादातूनच निघू शकतो. भारत सर्व देशांना शांततापूर्ण मार्गाने तोडगा
काढण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आत्मनिर्भर भारतावर भर
जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने विविध क्षेत्रांत
आत्मनिर्भरतेवर भर दिला आहे.
शिपबिल्डिंग, रेअर अर्थ मिनरल्स यांसारख्या
क्षेत्रांत देश स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मोदी यांनी सांगितले.
संकटातही देश सक्षम
“संकट ही देशाच्या धैर्याची परीक्षा असते,” असे सांगत त्यांनी गेल्या ११ वर्षांत भारताने विविध आव्हानांना समर्थपणे
तोंड दिल्याचे नमूद केले.
आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील
असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरी सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध
मध्यपूर्वेतील संघर्षाला तीन आठवड्यांहून अधिक काळ झाला असून त्यामुळे
जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले आहे.
भारताने नागरी पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि
वाहतूक व्यवस्थेवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. तसेच तणाव कमी करण्यासाठी
आणि होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी भारत सातत्याने प्रयत्न करत
असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.