सांगलीत अमानुष अत्याचार; चोरीच्या संशयावरून मुलींना उलटे टांगले, एकीचा मृत्यू
सांगली : आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे मानवतेला काळिमा फासणारी
अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप मुलींना
अमानुष छळ करण्यात आल्याने एका मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर जखमी आहे.
अमानुष छळाची परिसीमा
मिळालेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांच्या संशयावरून मुलींचे वडील
नाना हैबत यमगर यांनी बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास दोन्ही
मुलींचे हात-पाय बांधून त्यांना घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले. रात्रभर
त्या दोन्ही मुली वेदनेने तडफडत ‘पाणी, पाणी’ अशी आर्त हाक
देत होत्या. मात्र, आई-वडिलांनी त्यांच्याकडे पूर्णपणे
दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर
गुरुवारी सकाळी आजोबांनी मुलींना खाली उतरवले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. १० वर्षीय सानिका मृतावस्थेत आढळली,
तर ११ वर्षीय अनुजा गंभीर जखमी अवस्थेत होती. अनुजाला तातडीने
रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
गुपचूप अंत्यसंस्काराचा प्रयत्न
घटना बाहेर येऊ नये यासाठी कुटुंबीयांनी मृत सानिकेचा
गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुलीच्या जबानीतून उघड
जखमी अनुजा शुद्धीवर आल्यानंतर तिने वडिलांनीच मारहाण
करून टांगल्याचे सांगितले. यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दरम्यान, मुलींना सोडवणाऱ्या आजोबांवरही वडिलांनी कोयत्याने हल्ला केल्याचे समोर
आले आहे.
तपास सुरू, संताप उसळला
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून
नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा
सखोल तपास सुरू आहे. ही घटना केवळ गुन्हा नसून माणुसकीला काळिमा फासणारी क्रूरता
असल्याची भावना व्यक्त होत आहे.