डोंबिवलीत शिक्षिकेला अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग; आरोपीला अटक

डोंबिवली : डोंबिवली येथे एका नामांकित शाळेतील शिक्षिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाने वारंवार अश्लील व्हिडिओ पाठवत छळ केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मेसेजमधून सुरू झाला छळ

सागाव परिसरातील शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिकेला सुरुवातीला शाळेच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावरून मेसेज आले. लिपिक मेसेज करत असतील, असा समज करून शिक्षिकेने त्याला प्रतिसाद दिला. यानंतर आरोपी सरवन अय्यर याने वैयक्तिक क्रमांकावरून संपर्क साधत विविध मागण्या केल्या. शिक्षिकेने वारंवार नकार दिल्यानंतर त्याने अश्लील व्हिडिओ पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली.

तक्रारीनंतरही कारवाई नाही

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शिक्षिकेने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. मात्र, प्रशासनाने उलट शिक्षिकेलाच दोष देत व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केल्याचा आरोप करत तिची समज काढली.

मनसेच्या हस्तक्षेपानंतर कारवाई

दरम्यान, सहावीतील काही विद्यार्थिनींनीही आरोपीविरोधात तक्रार केल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांनी शाळेत धडक देत आंदोलन केले आणि आरोपीवर कारवाईची मागणी केली.

पोलिसांकडून आरोपी अटकेत

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल करत सरवन अय्यर याला अटक केली आहे. शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांनी प्रतिक्रिया देताना, “माझ्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे,” असे स्पष्ट केले.