भगवान नगर झोपडपट्टीतील नागरिकांचा प्रश्न मार्गी; कब्जा पावत्यांचा मार्ग मोकळा

सोलापूर शहरातील न्यू पाच्छा पेठ येथील भगवान नगर झोपडपट्टीतील नागरिकांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवास योजनेअंतर्गत येथे ३७२ घरे बांधून पूर्ण झाली असली, तरी त्यापैकी २८ घरांना अद्याप कब्जा पावती देण्यात आलेली नाही. तसेच काही घरांच्या बाबतीत स्थानिक अंतर्गत वादांमुळेही प्रक्रिया रखडली होती. यामुळे संबंधित नागरिकांना घरांचा अधिकृत ताबा मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदन देत सर्व पात्र घरांना लवकरात लवकर कब्जा पावत्या देण्याची मागणी केली. महापौर विनायक कोंड्याल यांनी या विषयावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व प्रलंबित घरांच्या पावत्या देण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या घडामोडींमुळे भगवान नगर झोपडपट्टीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांनी महापौर आणि संबंधित नगरसेविकेचे आभार मानले आहेत.