मराठा सेवा संघाची कक्षा व्यापक करण्याचे आवाहन; चंद्रशेखर शिखरे यांचे प्रतिपादन

सोलापूर : मराठा सेवा संघ ही समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत असलेली प्रभावी संघटना असून समाज बांधवांना एकत्र आणून त्यांची प्रगती साधणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे यांनी केले. सोलापुरात शनिवारी पार पडलेल्या केंद्रीय कार्यकारिणी, सोलापूर शहर-जिल्हा व पंढरपूर विभागाच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत संघटनेच्या विस्तारावर विशेष भर देण्यात आला. विविध स्तरांतील समाज बांधवांना संघटनेशी जोडून मराठा सेवा संघाची कक्षा अधिक व्यापक करण्याचे आवाहन करण्यात आले. संघटनेच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी दर महिन्याला नियमित बैठक घेण्याचा निर्णयही सूचित करण्यात आला. तसेच सक्षम, सक्रिय व समर्पित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोच वाढवणे आवश्यक असल्याचे शिखरे यांनी सांगितले. बैठकीत विवाह जुळवणीतील अडचणी आणि विवाहानंतर उद्भवणाऱ्या समस्यांवरही सखोल चर्चा करण्यात आली. या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

प्रदेश उपाध्यक्ष संदीपान जाधव यांनी जालना जिल्ह्यातील बचत गटाची यशोगाथा मांडली, तर नेताजी गोरे यांनी सोलापूर जिल्हा मराठा सेवा संघाच्या वाटचालीचा प्रेरणादायी आढावा घेतला. या बैठकीत आगामी नियोजनावर चर्चा करण्यात आली. पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमित निमकर, जी.के. देशमुख, सदाशिव पवार, उज्वला साळुंखे, सोमनाथ राऊत, दिनेश जगदाळे, प्रकाश ननवरे यांच्यासह सेवासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.