कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली ४ थी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिका सासणेवर दणदणीत विजय
सोलापूर : सोलापुरात पार पडलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती
स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत महाराष्ट्र केसरी
किताबावर आपले नाव कोरले. अंतिम लढतीत तिने कोल्हापूरच्याच वेदिका सासणे हिचा ७-०
असा पराभव केला. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात
अमृता सुरुवातीपासून आक्रमक होती. पहिल्या सत्रात तिने ५-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रातही तिने संयम राखत आणखी गुण मिळवत विजय निश्चित केला. या विजयाबद्दल
अमृता पुजारी हिला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते चांदीची गदा, ५१ हजार रुपये रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि सोनेट
कार प्रदान करण्यात आली. उपविजेती वेदिका सासणे हिला २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि बुलेट देऊन गौरविण्यात आले. विजयानंतर अमृता पुजारी हिची
मैदानावरून मिरवणूक काढण्यात आली. महिला कुस्तीपटूंनी आणि समर्थकांनी जल्लोष करत
तिचे अभिनंदन केले.
या स्पर्धेला महापौर विनायक कोंड्याल, हिंद केसरी योगेश दोडके, आयोजक स्वाती
अळळीमोरे-साखरे, तसेच कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर
उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महिला
कुस्ती स्पर्धेसाठी शासनाकडून ५० लाख रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव मांडणार
असल्याचे सांगितले.