सोलापुरात महिलांसाठी स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर; विशेष निधीची मागणी

सोलापूर : शहरातील महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव हा गंभीर प्रश्न बनला असून, हा मुद्दा महापालिकेच्या सभागृहात जोरदारपणे मांडण्यात आला. पत्रकार आणि स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी अंदाजपत्रकीय सभेत हा विषय उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले. महापालिकेच्या हद्दीत महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरुषांसाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना महिलांसाठी मात्र सुविधा अपुऱ्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभेत महिलांसाठी मंजूर करण्यात आलेला एक कोटी रुपयांचा निधी अपुरा असल्याचे सांगत, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शहरात “पिंक टॉयलेट” आणि सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवावी, असेही त्यांनी सुचवले. महिलांच्या स्वच्छतागृहांची उभारणी करून ती महिला बचत गटांना चालवण्यासाठी देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. यामुळे रोजगारनिर्मितीबरोबरच सुविधा अधिक सक्षमपणे चालवता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या आर्थिक स्थितीवरही चिंता व्यक्त करण्यात आली. घरपट्टी आणि पाणीपट्टीवर अवलंबून राहण्याऐवजी महापालिकेच्या मोकळ्या जागांवर व्यापारी संकुले, रेस्ट हाऊस किंवा निवासगृह उभारून महसूल वाढवण्याची गरज असल्याचे मत मांडण्यात आले. सभागृहातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.