गैबीपीर झोपडपट्टी परिसरात गॅससाठी नागरिकांची झुंबड; एजन्सी बंद, महिलांचे हाल
सोलापूर : शहरातील गैबीपीर झोपडपट्टी परिसरात सागर गॅस सिलिंडरसाठी
नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच गॅस
एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १ एप्रिल २०२६ रोजी
संबंधित भारत गॅस एजन्सीचे कार्यालय बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा
सामना करावा लागत आहे. एजन्सीच्या ठिकाणी कोणतीही सूचना फलकावर नसल्याने तसेच
कर्मचारीही अनुपस्थित असल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. गॅस सिलिंडर मिळेल की नाही
या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणावर एजन्सीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे परिसरात
गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात
तासन्तास थांबावे लागत असल्याने त्यांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. काही
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित
अधिकाऱ्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.