सोलापुरात भगवान महावीर जन्मोत्सव जल्लोषात; ऐतिहासिक संयुक्त शोभायात्रा

सोलापूर : भगवान महावीर यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सोलापुरात दिगंबर आणि श्वेतांबर जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेली संयुक्त शोभायात्रा ‘न भूतो न भविष्यती’ अशी ठरली. जैन मुनींच्या पावन सानिध्यात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी आचार्य शांतीसागर महाराज चौक (रंगभवन) येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. यापूर्वी ध्वजारोहण आणि वीरध्वज वंदन कार्यक्रम पार पडला. यावेळी निर्यापक श्रमण मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांनी उपस्थितांना मंगल आशीर्वाद देत “जगा आणि जगू द्या” हा भगवान महावीरांचा संदेश अधोरेखित केला. शोभायात्रेत हत्ती, घोडे, १२ बग्गी आणि १०८ फूट उंच जैन ध्वज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. दिगंबर समाजाची चांदीची पालखी आणि श्वेतांबर समाजाची चांदीची बग्गी यात भगवान महावीर विराजमान होते. ‘त्रिशला नंदन वीर की जय’ अशा जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. या मिरवणुकीत जैन गुरुकुल, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सर्वोदय विकास प्रभावना ट्रस्ट तसेच विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लेझीम पथक, भजन आणि दांडिया पथकांनी वातावरणात भक्ती आणि उत्साहाची रंगत आणली. कलेक्टर कार्यालयापासून सुरू झालेली शोभायात्रा विजापूर वेस, माणिक चौक, मधला मारुती, सराफ कट्टा मार्गे पुढे सरकत विविध भागातून मार्गक्रमण करत होती. ठिकठिकाणी रांगोळ्या, पुष्पवृष्टी आणि स्वागताने भाविकांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीचा समारोप माणिक चौक येथे झाला. त्यानंतर श्री आदिनाथ मंदिरात पंचामृत अभिषेक व शांतीधारा करण्यात आली. महावीर सांस्कृतिक भवन येथे आयोजित वात्सल्य भोजाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जैन समाजातील विविध ट्रस्ट, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.