बिहारच्या नालंदा मंदिरात चेंगराचेंगरी; ८ महिला भाविकांचा मृत्यू
नालंदा : बिहारमधील
नालंदा येथे एका मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ महिला भाविकांचा दुर्दैवी
मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत इतर अनेक भाविक जखमी
झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना
दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा येथील शीतला मंदिरात घडली. दर मंगळवारी
येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने आजही मोठी गर्दी झाली होती. मात्र, अपुऱ्या
व्यवस्थेमुळे अचानक चेंगराचेंगरी झाली आणि यात आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर
तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले
आहे. अंदाजे १० ते १२ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने
अद्याप मृतांचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. दरम्यान, घटनास्थळी
अनेक रुग्णवाहिका दाखल झाल्या असून पोलिसांनी परिसर रिकामा करून कडक बंदोबस्त
तैनात केला आहे. विशेष म्हणजे, आज नालंदा
विद्यापीठ येथे दीक्षांत समारंभ आयोजित
करण्यात आला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या
उपस्थितीमुळे सुरक्षेवर परिणाम झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जात
आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात
खळबळ उडाली असून नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.