सोलापुरात गॅससाठी लांबच लांब रांगा; अफवेमुळे घबराट, एक जण बेशुद्ध
सोलापूर : शहरातील कुमठा नाका परिसरात गॅस
एजन्सीसमोर गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला
मिळत आहे. सकाळपासूनच गॅस कार्यालयाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या
आहेत. बुधवारी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कडक उन्हामुळे रांगेत
थांबलेल्या एका व्यक्तीला चक्कर येऊन तो कोसळल्याने काही काळ गोंधळ उडाला. गॅस
टंचाईबाबत अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिलिंडर मिळेल की नाही या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणावर एजन्सीकडे धाव घेत आहेत.
मात्र, तेल विपणन कंपन्यांनी या अफवांना दुजोरा नसल्याचे
स्पष्ट केले असून गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले आहे. परिस्थिती
नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे
आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.