रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी १६ एप्रिलला महामोर्चा; आडम मास्तरांचा इशारा
सोलापूर, दि. १३ : “रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे
प्रशासनाने दुर्लक्षच केले तर प्रसंगी सोलापूर बंद करू, रक्त
सांडू; पण रिक्षा चालकांना न्याय मिळवून देऊ,” असा तीव्र इशारा ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार
कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी दिला. सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने
दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून,
त्याची माहिती आज दत्तनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात
आली. हा महामोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पुनम गेट या मार्गावर काढण्यात
येणार असून, मोर्चाचे नेतृत्व कॉ. आडम मास्तर करणार आहेत. यावेळी
बोलताना त्यांनी सांगितले की, सोलापूर शहर व जिल्ह्यातील
हजारो रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह पूर्णपणे एलपीजी गॅसवर अवलंबून आहे. मात्र अनेक
एलपीजी पंप बंद असल्याने चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. उपलब्ध
पंपांवरही अपुरा गॅस पुरवठा होत असल्याने रिक्षा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर
आहे. याशिवाय एलपीजीच्या वाढत्या दरामुळे चालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून
त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आश्वासनाचा भंग – चालकांमध्ये संताप कृती समितीच्या
शिष्टमंडळाने दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात
पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सुमारे १६ हजार रिक्षा चालकांच्या
रोजीरोटीच्या प्रश्नासंदर्भात निवेदन दिले होते. त्यावेळी संबंधित अधिकारी, रिक्षा चालक संघटना प्रतिनिधी व पंप चालक यांची संयुक्त बैठक १०
एप्रिलपर्यंत घेण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही ही बैठक
घेण्यात आलेली नसल्याने रिक्षा चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली
आहे. यासंदर्भात कॉ. आडम मास्तर यांनी पालकमंत्र्यांना पुन्हा पत्र देत तात्काळ
संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली असून, शहरातील सध्या ७
एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचा रोजगार मोठ्या प्रमाणात बुडत
असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
- सोलापूरातील सर्व एलपीजी पंप तात्काळ सुरू करावेत
- एलपीजी गॅस दरात तात्काळ कपात करावी
- रिक्षा चालकांसाठी नियमित व पुरेसा गॅस पुरवठा
सुनिश्चित करावा
रिक्षा चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन
आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या
महामोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) रिक्षा सेल, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, लालबावटा रिक्षा
संघटना, सोलापूर रिक्षा युनियन, सोलापूर
शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना (एस.टी. स्टॅण्ड), बसवसेना
रिक्षाचालक बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा
सेना (शरद पवार गट), रिपब्लिकन सेना रिक्षाचालक मालक संघटना,
रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना आदी संघटनांचा सक्रिय पाठिंबा असल्याची
माहिती देण्यात आली.
कृती समितीच्या वतीने सर्व रिक्षा चालकांनी मोठ्या
संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस
ॲड. अनिल वासम, चाँदसाब मुजावर (कमी), शाबूद्दीन शेख, रफिक काझी, प्रदीप
शिंगे, राजू शिदगणे, अमोल दुरके,
रियाज सय्यद, कॉ. एम. एच. शेख (CITU), युसुफ शेख (मेजर), महिपती पवार, अतिश शिंदे, अकील शेख, आसिफ
पठाण आदी उपस्थित होते.