अमरावतीत भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू

अमरावती : अमरावती-अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बेलोरा विमानतळ परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील सात युवक मध्यरात्री चहा पिण्यासाठी बाहेर गेले होते. परत येत असताना त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मोहम्मद अनस मोहम्मद सईद (वय २०), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (वय २२), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (वय २६) आणि अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (वय २२) यांचा समावेश आहे. सर्व मृतक बडनेरा जुनी वस्ती येथील रहिवासी होते. या अपघातात तीन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर बडनेरा परिसरात शोककळा पसरली असून एकाच भागातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.