नीट पेपरफुटी प्रकरणी सोलापुरात संतप्त आंदोलन; मोदी-शहा-प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन
नीट 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण
झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने
सोलापुरात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद पूनम गेट येथे झालेल्या या
आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात
आले.
आंदोलनादरम्यान संघटनेचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी सरकार आणि NTA वर जोरदार टीका केली. “दरवर्षी लाखो विद्यार्थी NEET परीक्षा देतात. मात्र NTA च्या निष्काळजीपणामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे नीट 2026 चा पेपर फुटला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत, “विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शनिवार, १६ मे २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनावेळी “NTA यंत्रणा रद्द करा”, “NEET ची फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्या”, “विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार शिक्षणमंत्री राजीनामा द्या” अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवत निषेध सुरूच ठेवला. यावेळी संघटनेचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी शिक्षण व्यवस्थेच्या खासगीकरणावर टीका करत सरकारवर निशाणा साधला. “शिक्षणाचे व्यापारीकरण झाल्याने विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा वाढत आहे. मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत गंभीर नसून जनविरोधी धोरणे राबवण्यात व्यस्त आहे,” अशी टीका त्यांनी केली. या आंदोलनात संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, राहुल बुघले, सुनील आमाटी, अप्पाशा चांगले, किशोर झेंडेकर, योगेश अकीम, दिनेश बडगू, चंटी बीटला, विजय साबळे, शाम आडम, गोपाल बंडी, पुष्पा गुरुपनवरु, प्रदीप मरेड्डी, नरेश गुल्लापल्ली तसेच विद्यार्थी आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.