माढ्यात आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश; आश्रमावर पोलिसांची पहाटे धाड

सोलापूर जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, मनोहर मामा प्रकरणानंतर आता माढा तालुक्यातील आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. आडेगाव येथे आश्रमाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या नाना महाराज उर्फ गुरुमाऊली वीरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी लोकांचे भविष्य बदलण्याचे, जादूटोणा करण्याचे तसेच पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करत होता. अनेक राजकीय नेत्यांचा आश्रमात वावर असल्याने आरोपी कोणतीही भीती न बाळगता आपला गैरप्रकार सुरू ठेवत असल्याची चर्चा परिसरात होती. या प्रकरणातील तक्रारदार पंढरपूर तालुक्यातील एक तरुण असून, २०२४ पासून आरोपी त्याला “माझ्याकडील कासव घेऊन जा, तुझ्यावर पैशांचा पाऊस पडेल आणि व्यवसायात मोठा फायदा होईल,” अशी खोटी आश्वासने देत होता. या आमिषाला बळी पडून संबंधित तरुणाने तब्बल पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम आरोपीला दिल्याचे समोर आले आहे. मात्र, कोणताही फायदा न होता उलट कर्ज वाढल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास आडेगाव येथील आश्रमावर छापा टाकला. आरोपी गुरुमाऊली वीरकर आणि त्याचा भाऊ विकास वीरकर यांना झोपेतूनच ताब्यात घेण्यात आले. दोघांविरोधात फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे याचा तपास पोलीस करत आहेत.