पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम? पाच महत्त्वाचे क्षेत्र अलर्टवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
तेलंगणातील सभेत केलेले भाषण हे केवळ इंधन बचतीचे आवाहन नसून वाढत्या जागतिक
आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिलेला महत्त्वपूर्ण इशारा मानला जात आहे. मध्य
पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती, होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे
आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन बैठका, पेट्रोल-डिझेलचा संयमित वापर, अनावश्यक परदेश प्रवास टाळणे, सोने खरेदी कमी करणे, खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवणे
आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन केले.
विमान आणि पर्यटन क्षेत्रावर
परिणाम
इंधन दरवाढ आणि परदेश प्रवास कमी होण्याच्या शक्यतेमुळे
विमान कंपन्या आणि पर्यटन क्षेत्रावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. विमान
कंपन्यांच्या खर्चात एव्हिएशन टर्बाइन इंधनाचा मोठा वाटा असल्याने तेलाच्या
वाढत्या किमतींचा थेट परिणाम या क्षेत्रावर होत आहे. मोदी यांच्या भाषणानंतर
इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.
तेल, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्र चिंतेत
भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत असल्याने कच्च्या
तेलाच्या दरवाढीचा परिणाम वाहतूक आणि वितरण व्यवस्थेवर होऊ शकतो. डिझेल महागल्यास
ट्रकिंग, ई-कॉमर्स डिलिव्हरी, बस सेवा आणि एफएमसीजी कंपन्यांचा
खर्च वाढण्याची शक्यता आहे.
शेती आणि खत उद्योगावर दबाव
रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या आवाहनामुळे कृषी
क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे. खतांच्या उत्पादनासाठी लागणारा गॅस महागल्यास
उत्पादन खर्च वाढू शकतो. याचा परिणाम शेती उत्पादन खर्च, अन्नधान्य दर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
सोने आणि लक्झरी वस्तूंवरील
मागणी कमी होणार?
सोने खरेदी टाळण्याच्या आवाहनानंतर ज्वेलरी कंपन्यांच्या
शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोने, लक्झरी वस्तू, महागडी इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रीमियम वाहनांच्या
मागणीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्योग आणि एमएसएमई क्षेत्रावर
ताण
कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे ऊर्जा, वाहतूक, केमिकल्स, प्लास्टिक आणि पॅकेजिंग क्षेत्रातील खर्च वाढू शकतो.
विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी
व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधान मोदींचे हे भाषण देशाला संभाव्य आर्थिक
संकटासाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा प्रयत्न असू शकतो.