पंतप्रधान मोदी माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; पत्नीची भावुक प्रतिक्रिया चर्चेत

पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका कृतीची मोठी चर्चा रंगली. मंचावर उपस्थित असलेल्या ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते माखनलाल सरकार यांच्या पाया पडून मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. या प्रसंगानंतर माखनलाल सरकार यांच्या पत्नी पुतुल सरकार यांनी भावुक प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “माझ्या पतीला इतका मोठा सन्मान मिळताना पाहून मला खूप आनंद झाला. त्यांनी आयुष्यभर संघटना आणि पक्षासाठी निष्ठेने काम केले आहे.” पुतुल सरकार यांनी सांगितले की, लग्नानंतर त्यांनी माखनलाल सरकार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पक्षासाठी सातत्याने मेहनत करताना पाहिले. ते पहाटे शाखेत जात आणि दिवसभर संघटनात्मक कामात व्यस्त राहत असत.

९८ वर्षीय माखनलाल सरकार हे भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपूर्वीपासून राष्ट्रवादी चळवळीशी जोडलेले कार्यकर्ते मानले जातात. १९५२ मध्ये त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काश्मीरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनादरम्यान त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. भाजपच्या स्थापनेनंतर १९८० मध्ये त्यांची पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांसाठी संघटन समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अल्पावधीत हजारो नवीन सदस्य पक्षात जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.