धक्कादायक! दारूच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा खून; अपघाताचा बनाव पोलिसांनी उघड केला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. सुरुवातीला दुचाकी घसरून झालेला अपघाती मृत्यू मानल्या गेलेल्या या प्रकरणात सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मृत युवकाचे नाव शुभम बालाजी खेळवणे (वय ३०) असे असून तो सिल्लोड येथील एका खासगी बँकेत नोकरीला होता. शुभम अविवाहित होता. तर आरोपी अतुल बालाजी खेळवणे हा विवाहित असून त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत.

१० मे रोजी मंगरूळच्या शेतशिवारातील रस्त्यावर शुभम दुचाकीवरून घसरून गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना संशयास्पद बाबी आढळल्या. दुचाकीचे कोणतेही नुकसान झाले नव्हते आणि मृताच्या शरीरावरील जखमाही अपघाताशी सुसंगत नव्हत्या. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या पथकाने अधिक तपास सुरू केला.

तांत्रिक माहिती, कॉल डिटेल्स आणि साक्षीदारांच्या चौकशीतून खरा प्रकार समोर आला. घटनेच्या दिवशी शुभमने दारूच्या नशेत गावातील एका व्यक्तीसोबत वाद घालून शिवीगाळ केली होती. ही बाब त्याचा मोठा भाऊ अतुल याला समजताच तो संतप्त झाला. त्याने शुभमला घरी बोलावून घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शुभमचे डोके जोरात जमिनीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या तपासात आरोपीचा कट उघड झाला. तांत्रिक पुरावे आणि चौकशीदरम्यान आरोपी अतुल याचा बनाव टिकला नाही. अखेर पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

न्यायालयाने आरोपी अतुल खेळवणे याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करत आहेत.