सोलापूर महापालिकेचा मोठा निर्णय; प्रत्येक सोमवार ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळणार

पंतप्रधान Narendra Modi यांनी इंधन बचत आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन Solapur Municipal Corporation ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाढती युद्धजन्य परिस्थिती, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणारे आर्थिक व पर्यावरणीय परिणाम तसेच वाढते वायू प्रदूषण लक्षात घेता महापालिकेने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.  या मोहिमेचा एक भाग म्हणून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस ‘No Vehicle Day’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खाजगी तसेच शासकीय दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्रत्येक सोमवारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस, सायकल, इलेक्ट्रिक वाहन किंवा पायी चालण्यास प्राधान्य द्यावे. पर्यावरण संरक्षणासोबतच इंधन बचतीचा संदेश समाजात पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे सांगण्यात आले आहे. महापौर विनायक संगीता रामकृष्ण कोंडयाल यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. “पर्यावरणाचे रक्षण करणे आणि देशहितासाठी छोटासा हातभार लावणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरात पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार असून नागरिकांमध्येही इंधन बचतीबाबत जनजागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.