बारामतीत प्रशिक्षण विमान उसाच्या शेतात कोसळले; वैमानिक थोडक्यात बचावला
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पुन्हा एकदा विमान
दुर्घटनेची घटना घडली आहे. बारामतीतील गोजुबावी गावाच्या हद्दीत आज सकाळी
प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे एक छोटे विमान उसाच्या शेतात कोसळल्याने परिसरात
मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या
माहितीनुसार, ‘रेड बर्ड’ कंपनीचे प्रशिक्षण विमान आज
सकाळी नियमित प्रशिक्षण उड्डाणासाठी निघाले होते. सकाळी सुमारे ८:४० वाजण्याच्या
सुमारास गोजुबावी गावाच्या उत्तरेकडील भागात, गावापासून
सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असताना विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड
झाला.
विमान हवेत असतानाच इंजिनचा आवाज बंद पडल्याने वैमानिकाने
प्रसंगावधान राखत लोकवस्तीपासून दूर असलेल्या उसाच्या शेतात इमर्जन्सी लँडिंग
करण्याचा प्रयत्न केला. मात्र लँडिंगदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमान थेट
उसाच्या शेतात कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत प्रशिक्षण घेत असलेला शिकाऊ
वैमानिक सुरक्षित असून, अपघातानंतर तो प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत
असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी
मोठी गर्दी केली. त्यानंतर बारामती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा
करत तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, ज्या गोजुबावी
परिसरात हा अपघात झाला त्याच भागात यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
विमानालाही अपघात झाला होता. त्यामुळे या परिसरात वारंवार घडणाऱ्या विमान
दुर्घटनांमुळे स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ही या भागातील तिसरी विमान
दुर्घटना असल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक तपासात विमानाचे इंजिन हवेतच बंद
पडल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमका तांत्रिक
बिघाड कशामुळे झाला, याचा अधिक तपास नागरी विमान वाहतूक
विभागाकडून केला जाणार आहे.