देवासमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; अनेक कामगार जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
मध्य प्रदेशातील Dewas जिल्ह्यातील एबी रोडवरील टोंकळा परिसरात असलेल्या
एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. हा
स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळच्या घरांच्या भिंती हादरल्या असून अनेक
किलोमीटरपर्यंत आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या दुर्घटनेत कारखान्यात
काम करणारे अनेक कामगार गंभीर जखमी झाले असून काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
समोर येत आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार मृतांचा आकडा १५ पर्यंत पोहोचू शकतो.
मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत मृतांचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर
परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. रस्त्यावर शरीराचे अवयव आणि
मांसाचे तुकडे विखुरल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. जखमींच्या
किंकाळ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल
झाली. बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले
आहे. दरम्यान, स्थानिक गावकऱ्यांनी कारखान्यात सुरक्षा
नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे. फटाके तयार
करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूगोळा उघड्यावर साठवला जात असल्याचे तसेच वारंवार
तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या
घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून कारखान्याचे मालक Anil Malviya यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच या कारखान्याला
राजकीय पाठबळ असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. घटनेनंतर प्रशासनाने स्फोटाच्या
कारणांचा तपास सुरू केला असून सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का याची चौकशी केली
जात आहे.