पेपरफुटीमुळे NEET 2026 परीक्षा रद्द; CBI चौकशीचे आदेश
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी NEET
(UG) 2026 परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ३ मे
रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा
संस्था (NTA) ने मोठा निर्णय घेत परीक्षा रद्द करण्याची
घोषणा केली आहे. या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आली आहे. एनटीएकडून ३ मे २०२६ रोजी देशभरात NEET 2026 परीक्षा घेण्यात आली होती. मात्र परीक्षा झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये
पेपरफुटीचे आरोप करण्यात आले होते. प्राथमिक तपासात पेपर लीक झाल्याचे स्पष्ट
झाल्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनटीएने
अधिकृत निवेदनात सांगितले की, परीक्षा नव्याने घेण्यात येणार
असून त्याच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज
किंवा नोंदणी करण्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच ज्या केंद्रावर विद्यार्थ्यांनी ३
मे रोजी परीक्षा दिली होती, त्याच केंद्रावर पुन्हा परीक्षा
देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान, या
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी CBI ला आदेश
देण्यात आले आहेत. पेपरफुटीमध्ये कोणत्या रॅकेटचा सहभाग आहे, याचा तपास आता केंद्रीय यंत्रणांकडून केला जाणार आहे. वैद्यकीय
अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी NEET परीक्षा अत्यंत
महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र परीक्षा
रद्द झाल्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण
निर्माण झाले आहे.