नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय, २१ जूनला फेरपरीक्षा
National Testing Agency (NTA) ने NEET UG 2026 पुनर्परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. पेपर फुटी प्रकरणामुळे रद्द
करण्यात आलेली परीक्षा आता २१ जून २०२६ रोजी देशभरात पुन्हा घेतली जाणार आहे. या
निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्याचे NTA ने स्पष्ट
केले आहे. यापूर्वी ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा
प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे वादात सापडली होती. तपासादरम्यान काही खासगी
क्लासेसमध्ये परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याचे समोर आले. तसेच ‘गेस
पेपर’मध्येही मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जसेच्या तसे असल्याचा दावा करण्यात आला
होता. या गंभीर प्रकरणाचा तपास सध्या CBI कडून सुरू आहे. NTA
ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून परीक्षा तारखेची घोषणा करत
विद्यार्थ्यांना केवळ अधिकृत संकेतस्थळावरील माहितीलाच विश्वास ठेवण्याचे आवाहन
केले आहे. यंदा NEET UG परीक्षा सुमारे २३ लाख
विद्यार्थ्यांनी दिली होती. परीक्षा रद्द झाल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
आणि नाराजी निर्माण झाली होती. मात्र आता नवीन तारीख जाहीर झाल्यामुळे
विद्यार्थ्यांना तयारीसाठी स्पष्ट दिशा मिळाली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता
नसल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे. पूर्वीची नोंदणी आणि
परीक्षा केंद्राची निवड कायम राहणार आहे. तसेच नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त
शुल्क आकारले जाणार नसून विद्यार्थ्यांकडून घेतलेली परीक्षा फी परत केली जाणार
असल्याची माहितीही देण्यात आली आहे. पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर NTA च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, पुनर्परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात घेण्याचे मोठे आव्हान
एजन्सीसमोर असणार आहे.