मुख्यमंत्री फडणवीसांच्या बुलेटवरून नवा वाद; PUC मुद्यावर काँग्रेस-भाजप आमनेसामने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दुचाकीवरून विधानभवनात
प्रवेश करत इंधन बचतीचा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच
नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘Royal Enfield
350’ बुलेट चालवत विधानभवन गाठले. विशेष म्हणजे त्यांच्या
सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफाही दुचाकींवरूनच प्रवास करताना दिसला.
मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या ‘रॉयल एन्ट्री’नंतर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेत्या Varsha Gaikwad यांनी संबंधित बुलेटच्या कागदपत्रांचा उल्लेख करत त्या वाहनाचे PUC प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचा आरोप केला. त्यांनी सोशल मीडियावर वाहनाची कागदपत्रे शेअर करत “Expired Maal चालतं का?” असा टोला लगावला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी Rahul Gandhi यांच्यावर टीका करताना “Expired Maal” हा शब्दप्रयोग केला होता. त्याचाच संदर्भ घेत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.दरम्यान, भाजपने काँग्रेसच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते Navnath Ban यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित वाहन हे पोलिस विभागाचे असून मुख्यमंत्र्यांच्या वापरासाठी ते पूर्णपणे तयार करण्यात आले होते. वाहनाची सर्व्हिसिंग करण्यात आली होती तसेच पर्यावरणीय प्रमाणपत्रही घेण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत “वाहन प्रणालीवर ९ ते १८ मे दरम्यान तांत्रिक काम सुरू असल्यामुळे ऑनलाइन नोंदी अपडेट नव्हत्या,” असे स्पष्ट केले. तसेच पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला काँग्रेस समर्थन देणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झाली असून इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी केलेल्या या उपक्रमावर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सावट आले आहे.