पुढील वर्षापासून NEET परीक्षा ऑनलाइन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
NEET 2026 पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण
झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांनी घोषणा करत
सांगितले की, पुढील वर्षापासून NEET (UG) परीक्षा ऑनलाइन म्हणजेच संगणक-आधारित पद्धतीने घेतली जाणार आहे. आतापर्यंत
NEET परीक्षा OMR शीटवर घेतली जात
होती. मात्र, यामुळे पेपरफुटी आणि गैरप्रकारांचा धोका वाढत
असल्याचे लक्षात आल्यानंतर परीक्षा प्रणालीमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त १५ मिनिटांचा
वेळही दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि
उत्तरपत्रिका व्यवस्थित भरण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. दरम्यान, पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली NEET UG 2026 पुनर्परीक्षा
आता २१ जून २०२६ रोजी घेतली जाणार आहे. प्रवेशपत्रे १४ जूनपर्यंत जारी केली जातील,
अशी माहितीही NTA कडून देण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले की, “पेपरफुटीच्या
प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. तपास सीबीआयकडे
सोपवण्यात आला असून शिक्षण माफियांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.” तसेच सोशल
मीडियावर परीक्षेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि चुकीच्या माहितीपासून सावध
राहण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना केले. अधिकृत माहिती केवळ
NTA च्या वेबसाईट आणि सरकारी माध्यमांवरूनच घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. NEET 2026 पेपरफुटी
प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या
पार्श्वभूमीवर परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने
ऑनलाइन परीक्षा प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.