पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीला अपघात; बाणेरमधील रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ज्येष्ठ नेते आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी दिलीप धोत्रे  यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात धोत्रे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे आपल्या वाहनातून प्रवास करत असताना एक्सप्रेस वेवर हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने पुण्यातील बाणेर परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप धोत्रे यांची प्रकृती स्थिर असून कोणतीही गंभीर चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. दिलीप धोत्रे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे अपघाताची बातमी समोर येताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर समर्थकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अधिक तपास सुरू असून पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे.