विधान परिषद निवडणुकांची घोषणा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण
पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र
विधान परिषदेतील रिक्त जागा भरण्यासाठी हालचालींना वेग आला असून स्थानिक स्वराज्य
संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणुकीची घोषणा
करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुका रखडल्यामुळे या मतदारसंघांतील अनेक जागा रिक्त राहिल्या होत्या. संबंधित
आमदारांचा कार्यकाळ संपल्यानंतरही नव्या निवडणुका घेता आल्या नव्हत्या. त्यामुळे
तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून विधान परिषदेतील काही जागा रिक्त होत्या. आता या
निवडणुकांमुळे त्या जागा भरल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण
78 सदस्यांपैकी 22 सदस्यांची निवड स्थानिक स्वराज्य
संस्था मतदारसंघातून केली जाते. मात्र, निवडणूक घेण्यासाठी संबंधित
मतदारसंघात किमान 75 टक्के मतदारसंख्या अस्तित्वात
असणे आवश्यक असते. ही अट पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणुकीचं वेळापत्रक :
25 मे रोजी अधिकृत अधिसूचना जारी
केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार
आहेत. 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल, तर 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे
घेण्याची मुदत असेल. यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
कोणत्या भागांत होणार निवडणुका?
पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, सांगली-सातारा, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली तसेच छत्रपती
संभाजीनगर-जालना या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमुळे विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक राजकारण
पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू
झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.
विधान परिषदेची रचना कशी असते?
महाराष्ट्र विधान परिषद हे राज्यातील उच्च सभागृह मानले
जाते. येथे एकूण 78 सदस्य असतात. त्यापैकी 30 सदस्यांची निवड आमदारांकडून, 22 सदस्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून, 7 सदस्यांची निवड पदवीधर मतदारसंघातून आणि 7 सदस्यांची निवड शिक्षक मतदारसंघातून केली जाते. उर्वरित 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
विधान परिषद निवडणुकांच्या
घोषणेमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून उमेदवारीवरून
विविध पक्षांमध्ये चुरस वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.