हिंद केसरी अंतिम फेरीत मोठा वाद; महेंद्र गायकवाड विजयी, पृथ्वीराज मोहोळने घेतली माघार

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोठा वाद निर्माण झाला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात ही अंतिम लढत रंगली होती. मात्र सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे पृथ्वीराज मोहोळ यांना माघार घ्यावी लागली आणि महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच महेंद्र गायकवाड यांनी आक्रमक खेळ करत पृथ्वीराज मोहोळ यांच्यावर दबाव निर्माण केला. त्यांनी सुरुवातीलाच दोन गुण मिळवत आघाडी घेतली. दरम्यान, डाव टाकताना पृथ्वीराज यांचा उजवा हात वाकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यानंतर कुस्ती काही काळ थांबवण्यात आली. दुखापत झाल्यानंतर पृथ्वीराज मोहोळ यांनी पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र हात हलविणेही कठीण होत असल्याने अखेर त्यांनी माघार घेतली. या घटनेनंतर पृथ्वीराज मोहोळ आणि त्यांचे वडील राजेंद्र मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. अखेर पंचांनी महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करत हिंद केसरी किताब प्रदान केला.

तीन वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारल्यानंतर अखेर महेंद्र गायकवाड यांनी हिंद केसरी किताब जिंकत मोठे यश मिळवले. हिंद केसरीची गदा आणि थार गाडीही त्यांनी पटकावली. यावेळी विजयी घोषित झाल्यानंतर महेंद्र गायकवाड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

या स्पर्धेत देशभरातील २८ राज्यांमधील सुमारे ८५० मल्ल सहभागी झाले होते. भारतीय शैली कुस्ती महासंघ, राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांनी उत्तर भारतीय मल्लांना पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. दरम्यान, अंतिम फेरीतील या प्रकारानंतर कुस्तीप्रेमींमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर महेंद्र गायकवाड यांच्या खेळीवर काहींनी टीकाही केली आहे.