NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
देशभरात गाजत असलेल्या NEET
2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
समोर आली आहे. लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज
मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतले आहे. लातूर आणि
पुणे येथे झालेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली
जात आहे.
लातूर हे वैद्यकीय शिक्षणाच्या
तयारीसाठी ‘लातूर पॅटर्न’मुळे देशभर प्रसिद्ध आहे. NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे
लातूरपर्यंत पोहोचल्यानंतर सीबीआयचे २८ अधिकाऱ्यांचे विशेष पथक येथे दाखल झाले
होते. या पथकाने शिवराज मोटेगावकर यांची तब्बल ८ ते १० तास कसून चौकशी केली.
चौकशीदरम्यान संशयास्पद बाबी आढळल्याने अखेर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात यापूर्वी पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी
यांना अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचे
नाव पुढे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सीबीआयने लातूरमध्ये तपासाची
चक्रे फिरवत मोटेगावकर यांच्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता
नांदेडपर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या विशेष पथकाने नांदेडमधील विद्युतनगर
परिसरातील एका संशयित कुटुंबाच्या घरावर छापा टाकून तब्बल ७ ते ८ तास चौकशी केली.
संबंधित कुटुंबाने आपल्या मुलीसाठी लाखो रुपयांत NEET प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा
संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे
महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण
झाले आहे. सीबीआयच्या पुढील तपासातून आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली
जात आहे.