केरळमध्ये लवकरच मान्सूनची एन्ट्री; मुंबईत उकाडा वाढला, IMD कडून हवामानाचा अंदाज
केरळमध्ये येत्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त
करण्यात आल्याने महाराष्ट्रासह मुंबईकरांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले
आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये
यंदा २६ मेच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो. ही तारीख चार दिवस पुढे किंवा मागे
होण्याची शक्यता देखील विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईत
वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी सांताक्रूझ
येथे ३४.१ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
झाली. सर्वसाधारणपणे कुलाबा येथे तापमान कमी असते, मात्र
यावेळी सांताक्रूझ परिसरात वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने तेथील तापमान तुलनेने कमी
राहिल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली.
मुंबईत शुक्रवारपर्यंत कोरडे वातावरण कायम राहण्याचा अंदाज असून २० ते
२४ मे दरम्यान कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. अद्याप मुंबईत
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली नाही. राज्यातील इतर भागांतही उष्णतेचा प्रभाव
कायम आहे. कोल्हापूर येथे ३७.५ अंश सेल्सिअस तर नाशिक येथे ३९.९ अंश सेल्सिअस कमाल
तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्येही तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवण्यात आले
असून तेथे ३२.३ अंश सेल्सिअस तापमान राहिले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण
किनारी आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागात निर्माण झालेल्या चक्रीय परिस्थितीमुळे
केरळ, माहे, दक्षिण कर्नाटक आणि
रायलसीमा भागांत पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच दक्षिण लक्षद्वीपलगतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने
मान्सूनच्या प्रगतीला वेग मिळण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनने आग्नेय अरबी
समुद्र, कन्याकुमारी परिसर, बंगालच्या
उपसागराचा दक्षिण भाग तसेच अंदमान-निकोबार बेटांपर्यंत आगेकूच केली असल्याची
माहिती हवामान विभागाने दिली आहे.