‘एक घर - एक झाड’ अभियानाचा शुभारंभ; सोलापुरात ५ हजार रोपांचे मोफत वाटप

वाढते तापमान, प्रदूषण तसेच पाण्याची टंचाई या गंभीर समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून ‘सोलापूर ग्रीन मिशन’च्या वतीने “एक घर - एक झाड” हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत शहरातील नागरिकांना वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या माध्यमातून तब्बल ५ हजार रोपे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, वॉकिंग ट्रॅक, पाणी टाकी चौक, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे होणार आहे. कार्यक्रमास आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंडयाल, आयुक्त सचिन ओंबासे तसेच सभागृह नेते नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अभियानामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे “प्रत्येक घरात किमान एक झाड” हा संकल्प प्रत्यक्षात आणून सुंदर, प्रदूषणमुक्त आणि हरित सोलापूर निर्माण करणे, असे सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी आणि स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.