पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि
बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या
टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ६३४ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण ३ कोटी ३ लाख ९६ हजार
रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. भारत
सरकारच्या “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत पुणे ग्रामीण जिल्ह्यात अंमली
पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह
गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.
या प्रकरणाची सुरुवात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती
शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एनडीपीएस गुन्ह्यापासून झाली. जळोची-पिंपळी रोड
परिसरातील एका शेतात दोन प्लास्टिक ड्रममध्ये ४७८.९५० किलो गांजा साठवून ठेवण्यात
आल्याचे समोर आले होते. या गांज्याची किंमत सुमारे २ कोटी ३९ लाख रुपये असल्याचे
पोलिसांनी सांगितले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी समाधान
गायकवाड, विकी ऊर्फ पप्पू कांबळे आणि त्यांच्या साथीदारांचा या रॅकेटमध्ये सहभाग
असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ३ मे रोजी तांदूळवाडी परिसरातून प्रकाश ऊर्फ
पक्या काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार
मुन्ना सिंग आणि राहुल गोरे यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी विकी ऊर्फ पप्पू
कांबळे, संग्राम ऊर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी यांच्या
मदतीने छत्तीसगडमधून गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रात विक्रीसाठी साठवल्याची कबुली
दिली. त्यानंतर २० मे रोजी आरोपी दोन टोयोटा इनोव्हा कारमधून पंढरपूर-फलटण मार्गे
बारामतीकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यापैकी एक वाहन तासगावच्या
दिशेने गेल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली. सांगली
पोलिसांनी संबंधित इनोव्हा वाहन ताब्यात घेऊन १३४ किलो गांजा जप्त केला आणि कांबळे
याला अटक केली. दुसऱ्या पथकाने बारामतीमध्ये दुसऱ्या इनोव्हा कारवर कारवाई करत २३
किलो गांजा जप्त केला. या कारवाईत हुसेन लष्करे, आदित्य
शिंदे आणि युवराज दुर्गे यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात आरोपी
छत्तीसगडमधून गांजा खरेदी करून सोलापूर, सांगली आणि सातारा
जिल्ह्यातील विक्रेत्यांना पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई अपर पोलीस
अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन
राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद
क्षीरसागर, बारामती शहरचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य
चिवडशेट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे आणि त्यांच्या पथकाने केली.