आंबेनळी घाट दुर्घटनेने आसगाववर शोककळा; पाच मित्रांचा एकाच अपघातात दुर्दैवी अंत
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात
झालेल्या भीषण अपघाताने सातारा जिल्ह्यातील आसगाव गाव हादरून गेले आहे. स्कॉर्पिओ
गाडी तब्बल १००० फूट खोल दरीत कोसळल्याने आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये
आसगाव गावातील पाच युवकांचा समावेश असल्याने गावात शोककळा पसरली आहे. मृत
तरुणांमध्ये महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश
राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१),
अनिल अभिमन्यू शिंगटे (३५) आणि नितीन किसन नायकोंडे (३५) यांचा
समावेश आहे.
विशेष म्हणजे, मृत्यू झालेल्या पाच युवकांचे घर एकाच गल्लीमध्ये
असून ते लहानपणापासून एकत्र वाढलेले मित्र होते. रविवारी पर्यटनासाठी कोकणात
गेलेले हे सर्व युवक सोमवारी परतीच्या प्रवासात काळाच्या पडद्याआड गेले. अपघातानंतर
आसगाव गावात महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा आक्रोश आणि
गावकऱ्यांचे अश्रू पाहून वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. गावातील अनेक घरांत
चूलही पेटली नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, गावकऱ्यांनी या दुर्घटनेसाठी घाटरस्त्यावर संरक्षण
कठडे नसल्याबद्दल प्रशासनाला जबाबदार धरले आहे. रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजना
अपुऱ्या असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबियांना
शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली
आहे.
अपघातग्रस्त स्कॉर्पिओ (MH 11 DN 2340) ही आसगाव येथील असल्याची माहिती समोर
आली आहे. खोल दरीत कोसळल्यामुळे वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून सर्व युवक
जागीच ठार झाले. मृत युवकांशी संपर्क होत नसल्याने अंश चव्हाण यांच्या वडिलांनी
पोलादपूर पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेत
असताना हा भीषण अपघात उघडकीस आला.
सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासन, पोलीस
आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत.