लेकराचं डायपर आणायला गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मोबाईलच्या एका रिंगमुळे उलगडली घटना

सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचे डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा पनाश अपार्टमेंट परिसरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव सुफियान गुलाम रसूल शेख (वय २४, रा. नई जिंदगी, सोलापूर) असे आहे. तो फॅब्रिकेशनचे काम करत होता. सुफियानचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगाही आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास सुफियान हा “मुलाचे डायपर पॅड घेऊन येतो” असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, घरातून निघाल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांतच तो पनाश अपार्टमेंट परिसरात पोहोचला आणि काही वेळातच त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री आठच्या सुमारास पनाश अपार्टमेंट परिसरातील वॉचमन नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना त्याला एक तरुण निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. हात आणि पाय वाकड्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराव गायकवाड तसेच पोलीस कर्मचारी विलास घुगे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, बराच वेळ सुफियान घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर फोन करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी पोलिसांनी वाजणारा फोन उचलला असता कुटुंबीयांनी “कितना देर हुआ, कहाँ है तू?” असा प्रश्न विचारला. त्यानंतर पोलिसांनी घडलेली माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. सुफियानचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, अपघात आहे की घातपात, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.