दुष्काळात तेरावा महिना; व्हॉल्व तुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया, लक्ष्मी मंडई परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

एकीकडे सोलापूर शहरात तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असताना दुसरीकडे लक्ष्मी मंडई परिसरात पाण्याच्या पाइपलाइनचा व्हॉल्व खराब झाल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरातील रस्त्यांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. महापालिकेकडून सध्या शहरात सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राणी लक्ष्मीबाई मंडई येथील व्हॉल्व अचानक खराब झाल्याने पाइपलाइनमधून मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडू लागले. या बिघाडामुळे दत्त चौक, झुंझे बोळ, लक्ष्मी मंडई आणि आसपासच्या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाण्याचा दिवस असूनही अनेक नागरिकांच्या नळांना पाणी आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या कामकाजावर संताप व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश धाराशिवकर यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत पाणीपुरवठा यंत्रणेतील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महापालिकेने तातडीने दुरुस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.