महाराष्ट्र काँग्रेसची संघटनात्मक पुनर्रचना जाहीर; सोलापूर शहराध्यक्षपदी चेतनभाऊ नरोटे
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. खा. श्री. मल्लिकार्जुन
खरगे यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक जिल्ह्यांच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव आज
दिनांक २० मे २०२६ रोजी मंजूर केला असून, संघटनात्मक कार्यक्षमता अधिक बळकट करण्याच्या
उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पुनर्रचित
जिल्हा काँग्रेस समित्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या प्रस्तावालाही मंजुरी
देण्यात आली असून, या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू
करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल
यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. त्याअन्वये सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या
अध्यक्षपदी चेतनभाऊ नरोटे, सोलापूर पूर्व जिल्हा काँग्रेस
अध्यक्षपदी सातलिंग शटगार तर सोलापूर पश्चिम जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी संदीप
साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या “संगठन सृजन अभियान” अंतर्गत
करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात
आलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी सविस्तर आढावा घेत पक्ष
पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधित घटकांशी संवाद साधून
सर्वसमावेशक अहवाल सादर केले होते. त्यानंतर प्रत्येक निरीक्षक तसेच वरिष्ठ
नेत्यांसोबत स्वतंत्र चर्चा करून या निवडी करण्यात आल्या. या निवडीबद्दल देशाचे
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रणिती
शिंदे तसेच शहर व जिल्ह्यातील नेतेमंडळी, पदाधिकारी आणि
कार्यकर्त्यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी, अखिल
भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मा. खा. श्री. मल्लिकार्जुन खरगेजी तसेच
लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. खा. श्री. राहुलजी गांधी, महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस
पक्षाचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी
नवनियुक्त पदाधिकारी भरीव कार्य करतील, असा विश्वास यावेळी
व्यक्त करण्यात आला.