जनगणना २०२७ अंतर्गत घरगणना कामाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडून पाहणी

भारत सरकारच्या जनगणना २०२७ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात सुरू असलेल्या घर यादी व घरगणना कामाचा आढावा घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे यांनी विविध चार्जची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित चार्जमधील प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्याशी संवाद साधत घरगणना प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी, तांत्रिक समस्या तसेच नागरिकांकडून मिळणारे सहकार्य याबाबत माहिती घेतली. घरगणना प्रक्रिया अचूक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांना येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक नागरिकांच्या घरी भेट देत असल्याने आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे यांनी देखील प्रगणक आणि पर्यवेक्षकांना काम अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित चार्ज अधिकारी अविनाश वाघमारे, राघवेंद्र गायधनकर यांच्यासह इतर चार्ज अधिकारी, प्रगणक आणि पर्यवेक्षक उपस्थित होते. तसेच जनगणना मुख्य कार्यालयातील आशिष घुले (कनिष्ठ अभियंता), संदीप भोसले आणि आदिनाथ कांबळे यांनीही सहभाग घेतला.