“पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सर्व कामे पूर्ण करा” ; महापौर विनायक कोंड्याल यांचे प्रशासनाला निर्देश
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या
टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात
आली. ही पाहणी महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त
डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त सोनाली यादव आणि नगर अभियंता सारिका अक्कूलवार यांच्यासह संबंधित
विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नगरसेवक उपस्थित
होते. पाहणीदरम्यान जुना पूना नाका येथील नाला, बाळे
परिसरातील वैष्णवी हाइट्स, उमानगरमधील शरदचंद्र पवार
शाळेजवळील नाला, स्पर्श हॉस्पिटल परिसर, गुलमोहर अपार्टमेंट, ६ कमान, १४
कमान, यश नगर आणि ५४ मीटर रस्ता परिसरातील नाल्यांची सविस्तर
तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा
प्रवाह, गाळ साचलेली ठिकाणे, अतिक्रमणे
तसेच निचऱ्याची स्थिती याबाबत माहिती घेण्यात आली. काही ठिकाणी नाल्यांच्या
प्रवाहात अडथळा निर्माण करणारे छोटे पूल व अन्य अडथळे आढळून आले. त्यावर तात्काळ
कार्यवाही करून अडथळे दूर करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित विभागांना दिल्या. महापौर
विनायक कोंड्याल यांनी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे निर्देश देत,
नाल्यांमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबतही सखोल चौकशी करून आवश्यक
कारवाई करण्यास सांगितले.
यावेळी बोलताना महापौर म्हणाले, “पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये,
शहरात पाणी साचू नये आणि नाल्यांमधील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा
यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. ज्या ठिकाणी समस्या आढळतील त्या
तातडीने सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” महापालिकेच्या या पाहणी
मोहिमेमुळे शहरातील नाला स्वच्छता आणि पावसाळी पूर्वतयारीच्या कामांना अधिक गती
मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.