सोलापूरात वृक्षसंहार; प्लॉटिंगसाठी 135 हून अधिक झाडांची अवैध कत्तल, 5 ट्रक लाकूड विक्रीचा आरोप
सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सलगरवाडी परिसरात चोपन्न मीटर रोडलगतच्या सुमारे 8 हेक्टर शेतजमिनीतील 30 ते 50 वर्षे वयाची तब्बल 135 ते 150 मोठी झाडे अवैधरित्या तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्लॉटिंगसाठी जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने गेल्या दहा दिवसांत पिंपळ, जांभूळ, आंबा आणि बहुतांश लिंब जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच या झाडांमधून सुमारे 5 ट्रक लाकूड विक्री करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. परिसरात माणसांची वर्दळ कमी असल्याचा फायदा घेत वृक्षतोड गुप्तपणे सुरू असल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर आणि वृक्षप्रेमी
डॉ. राम हुंडारे यांनी घटनास्थळी धाव घेत लाकूड भरलेली आयशर गाडी (MH 13 CJ 9047) अडवून ठेवली. त्यानंतर वनविभाग, पोलीस आणि महापालिका
अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
वनविभागाच्या सौ. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुरज कोतवाल आणि महापालिका उद्यान प्रमुख कोमल काशीद यांच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा केला. महापौर विनायक कोंड्याल यांनी या प्रकरणात महानगरपालिकेकडून कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. “44 अंश तापमानात सावली देणारी झाडे तोडणे अत्यंत वेदनादायी आहे. विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांनी सांगितले की, “गेल्या 10 दिवसांत चार ट्रक लाकूड नेण्यात आले असून आज एक वाहन पकडण्यात आले. तापमान वाढत असताना अशा वृक्षतोडीला माफी नाही. दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.” महाराष्ट्रातील नियमांनुसार खाजगी जमिनीवरील वड, पिंपळ, आंबा यांसारखी मोठी झाडे तोडण्यासाठी वनविभाग, तहसील आणि महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक असते. तसेच एका झाडाच्या बदल्यात नवीन झाडे लावणे बंधनकारक आहे. विनापरवानगी वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई आणि गुन्हा दाखल होऊ शकतो.