मुंबईत म्हाडा घरांसाठी अर्जाची अखेरची संधी; आतापर्यंत ८८ हजारांहून अधिक अर्ज दाखल
म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या २,६४० घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची आज, २८ मे ही अंतिम संधी आहे. सुरुवातीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर विक्रोळीतील घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या तसेच अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर अर्जदारांचा प्रतिसाद वाढला असून आतापर्यंत ८८,७६३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६२,४२० अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सहभाग निश्चित केला आहे. म्हाडाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना २८ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच २९ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अनामत रक्कम भरता येईल. आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारेही संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या सोडतीमध्ये विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, गोराई, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, वडाळा, पवई, दादर आणि मानखुर्द या भागांमध्ये घरे उपलब्ध आहेत. एकूण २,६४० घरांपैकी १,७६२ घरांचे बांधकाम अद्याप सुरू असून ती घरे विक्रोळी, गोरेगाव आणि बोरिवली परिसरात आहेत. यामध्ये बोरिवली पूर्व येथील १२८ सदनिका आणि गोरेगाव पश्चिम येथील ८५ सदनिकांचा समावेश आहे. उर्वरित घरे विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे उपलब्ध आहेत. म्हाडाने यंदा सुमारे १,२२१ घरांच्या किंमतीत ७.५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यात विक्रोळीतील उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील ६१० घरांचाही समावेश आहे.
दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरातील उच्च उत्पन्न गटातील घरे सर्वाधिक महाग असून त्यांची किंमत सुमारे ६.८२ कोटी रुपये आहे. तर मानखुर्द येथे सर्वात स्वस्त घरे उपलब्ध असून त्यांची सुरुवातीची किंमत सुमारे २९ लाख रुपये आहे. गोरेगावमधील ३०० चौरस फुटांच्या घरांची किंमत सुमारे ३२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १० जून रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १२ जूनपर्यंत दावे आणि हरकती ऑनलाइन नोंदवता येणार असून अंतिम यादी १६ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.